पूर्वीच्या तुलनेत मध्यंतरी लोकांचे मंदिरात जाण्याचे प्रमाण कमी झाले होते. परंतु आता पुन्हा हळूहळू धर्म जागृती होत आहे तसे लोकांचा
मंदिरात जाण्याचा कल वाढू लागला आहे. पूर्वी आपले आजी आजोबा अंघोळ करून घरच्या देवाची पूजा करून देव दर्शनाला मंदिरात जात असत. एकटे नाही, तर नातवंडांना सोबत नेत असत. त्यामागे कारण काय असेल? याचा विचार केला आहे का? देव्हाऱ्यातले देव आणि मंदिरातले देव वेगळे आहेत का? नाही! दोन्ही एकच, परंतु स्थानमहात्म्याचा फरक पडतो.
ज्याप्रमाणे घरी व्यायाम करण्याऐवजी तुम्ही जिम मध्ये जाऊन व्यायाम करणे पसंत करता. का? कारण तिथे जाऊन आपोआप व्यायाम करण्याची उर्मी येते. ते स्थान व्यायाम करण्यासाठीच बनवलेले असते. घरी पुस्तक वाचायला बसलात, की तासाभरात झोप यायला लागते, पण ग्रंथालयात एवढ्या पुस्तकांच्या गराड्यात बसलेलो असतानाही झोप येत नाही. उलट त्या शांततेत मन एकाग्र होते. एवढेच काय, तर कोव्हीडमुळे वर्षभरात अनेकांचे वर्क फ्रॉम होम सुरू आहे. परंतु ऑफिसमध्ये बसून काम करणे आणि घरी बसून काम करणे यात केवढे अंतर आहे, ते आपण सर्वांनीच अनुभवले. कामचलाऊ उपाय हे कायमस्वरूपी पर्याय ठरू शकत नाहीत. त्याचप्रमाणे मंदिर बंद असताना आपण देव्हाऱ्यातल्या देवापुढेच ध्यान लावून प्रार्थना केली. परंतु, जी अनुभूती मंदिरात येते, ती घरात येणे कठीण!
मंदिरे ही सार्वजनिक चार्जिंग सेंटर आहेत, असे म्हणायला हरकत नाही. मंदिरात चपला काढून, पाय धुवून मग प्रवेश करतो. मंदिराचा मोकळा सभामंडप आपले सगळे विचार विसरायला लावतो. आपण ‘मी’ मधून ‘आम्ही’च्या विश्वात प्रवेश करतो. म्हणून तिथे गेल्यावर स्वतः साठी काही मागत न बसता, तिथली सकारात्मक ऊर्जा शक्य तेवढी शोषून घ्यावी. मंदिरे हे काही देवाकडे मागण्याचे ठिकाण नाही. ते विद्युत ऊर्जा केंद्र आहे. तिथे आपण सांसारिक प्रश्न घेऊन गेलो, तर मन:शांती कधीच लाभणार नाही. तिथल्या वातावरणाशी एकरूप होऊन उदबत्तीचा, धुपाचा, फुलांचा गंध घ्या. तिथल्या सकारात्मक लहरींशी मन जोडण्याचा प्रयत्न करा. देवासमोर तेवणाऱ्या मंद समईच्या प्रकाशात देवाची मूर्ती पहा आणि शांत चित्त लावून ध्यान धारणा करा.
मंदिर हे वैयक्तीक व सामूहिक उपासनेचे शक्तिस्थान असते. त्यामुळे प्रत्येक मंदिर हे जागृत असतेच. ही बाब महत्त्वाची असते. म्हणून निश्चयपूर्वक मंदिरात ध्यान करावे, जप करावा, आरत्या कराव्यात, भजने करावीत, कीर्तने करावीत, नाचावे, गावे, सकाळी काकडा व सायंकाळी हरिपाठ करावा. प्रदक्षिणा कराव्यात, ग्रंथ वाचन करावे, ग्रंथ पारायणे करावीत,
या सर्व गोष्टी घरात बसून अनुभवता येणार नाहीत. एकदा का मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली, की मनालाही मंदिराची ओढ लागेल.