जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी : पूजा कशी कराल ? जन्मोत्सव कसा कराल ?

Share This Post

 

दिनांक२६ ऑगस्ट सोमवार या दिवशी
कृष्ण जन्माष्टमी आहे (अर्थ: कृष्णाच्या जन्माचा दिवस ) ज्याला जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी असेही म्हणतात, हा वार्षिक हिंदू सण आहे .

श्रावण वद्य अष्टमीस मध्यरात्री कृष्णजन्म झाला, म्हणून हा दिवस कृष्णजयंती, जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी या नावांनी ओळखला जातो. देवकीच्या उदरी कृष्णाचा जन्म होताच वसुदेवाने कंस भयास्तव रातोरात कृष्णाला गुप्तपणे गोकुळात नंद यशोदेकडे पोहोचविले. गोकुळात कृष्णजन्मामुळे आनंदी आनंद झाला. या दिवशी उपवास करतात. रात्री मंदिरातून जन्मोत्सव आणि कथाकीर्तने होतात. वैष्णव संप्रदायात हा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जातो. गोकुळ, वृंदावन, मथुरा, पुरी, द्वारकादी क्षेत्रांत, कृष्णजयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. वृंदावन येथे या निमित्ताने ‘दोलोत्सव’ होतो. कोकणात व महाराष्ट्रात उत्सवानिमित्त दहीकाला होतो व दहिहंड्या फोडतात. काही ठिकाणी गोपालकाला होतो.


श्रावण महिन्यात कृष्ण अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे.


गोपाल कृष्ण हा विष्णूचा आठवा अवतार असलेल्या कृष्णाचा जन्म हिंदू चंद्र सौर दिनदर्शिकेनुसार, श्रावण या महिन्यात; तर ग्रेगोरियन कॅलेंडरच्या ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात हा सण येतो. हा हिंदू धर्मातील विशेषतः वैष्णव पंथातील एक महत्त्वाचा सण आहे. भागवत पुराणानुसार कृष्णाच्या जीवनावर आधारित नृत्य-नाटक (जसे की रास लीला किंवा कृष्णलीला), मध्यरात्री भक्तीगीत गायन, उपवास, पूजा,रात्री जागरण आणि पुढील दिवशी महोत्सव यांचा जन्माष्टमी उत्सवामध्ये समावेश होतो. कृष्ण जन्माष्टमीनंतर नंदोत्सव हा सण साजरा केला जातो. नंदाने जन्माच्या सन्मानार्थ लोकांना भेटवस्तू वितरित केल्या होत्या, त्याचा हा सण असतो.

आपल्या Online पूजा बुक करण्यासाठी येथे क्लिक करा


गोपालकाला ..उत्सवासाठी तयार केल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रसादास गोपालकाला असे म्हणतात. कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो.महाराष्ट्रात विशेषतः कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनेक लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात.

कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दुधाने भरलेला हंडा ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो. हा महाराष्ट्रातील एक वैष्णव नृत्योत्सव आहे. श्रीकृष्णाने व्रज मंडळात गाई चारताना आपण व आपले सवंगडी या सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून त्या खाद्य पदार्थांचा काला केला व सर्वांसह त्याचे भक्षण केले अशी कथा आहे. या कथेला अनुसरून गोकुळाष्टमीच्या दिवशी एका सजवलेल्या मडक्यात काला करून ते दोरीच्या सहाय्याने उंचावर बांधण्याची व मानवी मनोरे रचून ती दहीहंडी फोडण्याची प्रथा आहे. जास्तीत जास्त उंचीवर जाऊन हंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकाला आकर्षक बक्षीस दिले जाते. यावेळेस गाणी, नृत्य, विविध कार्यक्रम होतात व बघणाऱ्यांची जल्लोषासहित मोठी गर्दी जमलेली असते.

गोपाल म्हणजे गायीचे पालन करणाऱ्या कृष्णाच्या या जन्मोत्सवाच्या निमित्ताने काल्याचा प्रसाद केला जातो.

काला म्हणजे एकत्र मिळविणे.
पोहे, ज्वारीच्या लाह्या, धानाच्या लाह्या, लिंबू व आंब्याचे लोणचे, दही, ताक, चण्याची भिजविलेली डाळ, साखर, फळांच्या फोडी इत्यादी घालून केलेला एक खाद्यपदार्थ. हा कृष्णास फार प्रिय होता असे मानले जाते. श्रीकृष्ण व त्याचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा तयार करीत असत व वाटून खात असत असे मानले जाते. गोमंतकात याच काल्याला गवळणकाला म्हणतात. हा काला तिथल्या कलावंतिणी करतात. त्यात एका मुलीला कृष्णाचे सोंग देऊन कृष्णलीलेची गाणी म्हणतात. शेवटी कृष्णाकडून दहीहंडी फोडवितात. हा गवळण काला दशावतारी खेळानंतर किंवा देवस्थानाचा रथोत्सव झाल्यानंतर होतो.


जन्माष्टमी जरी धार्मिक असला तरी सध्या हा सामाजिक आनंदोत्सव म्हणून साजरा होतो . सामाजिक एकता , परमेश्वरावरील असीम श्रध्दा व भक्ती याचा सुंदर मिलाप असलेल्या या उत्सवात सहभागी होऊन आनंद घ्या .


जन्माष्टमीस पूजा कशी कराल ? …

मध्यरात्री पूर्वी 1 तास ताम्हणात गोपालकृष्णाची मूर्ती घ्यावी ती तुलसीपत्रावर ठेवावी तिला प्रथम गंगाजल दूध व पाणी अर्पण करावे नंतर ताम्हणातच प्रथम गंध तुळशीपत्र अर्पण करावे .नंतर अभिषेक घालावा त्यावेळी पुरुषसुक्त ऑडिओ लावा . (लिंक खाली देत आहे ) सतत पळीने पाणी घालावे नंतर पंचामृत घालून शुद्ध उदक घालून देव पुसून सजविलेल्या आसनावर तुलसी पत्र ठेवून त्यावर ठेवणे .अत्तर व सुगंधी द्रव्य गंध पुष्प व तुलसीदल अर्पण करावे देवाला वस्त्र अर्पण करावे . त्यानंतर सहस्त्र तुलसी अर्पण कराव्या त्यावेळी विष्णू सहस्त्रनाम लावावे ( लिंक खाली देत आहे ) आपण गोपाळ काला ,पेढे,खडीसाखर व विशेष लोणी साखरेचा नैवेद्य अर्पण करावा पीवळी पुष्प तुळस अर्पण करावी आरती करावी व उपस्थितांना प्रसाद वाटावा .आपल्या सांसारिक व आध्यात्मिक मागणे श्री चरणी ठेवावे .ओम नमो भगवते वासुदेवाय हा एक माळ जप करावा .सकळ कुटुंबाची कल्याणाची कामना करून पूजा संपन्न करावी .कुळात प्रथेने आणखीन काही पूजन किंवा उपचार असतील तर तेही करावे . कुटुंब गोकुळासारखे सुखी व समृद्ध होते असा भक्तांचा अनुभव आहे .
कल्याण मस्तु


श्री कृष्ण चरणी भक्ती भावासह समर्पण ।।

श्री तुषार कदम – मुख्य पुजारी – तुळजाभवानी मंदिर – तुळजापूर

आपण जाणतो की बहुतेक लोक जे देवी-देवतांचे महान भक्त आहेत, परंतु काही वैयक्तिक अडचणींमुळे जेव्हा त्यांना मंदिरात जायचे असते तेव्हा ते जाऊ शकत नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच भक्तांना जे परदेशात राहतात त्यांची सेवा मिळवण्यास उत्सुक आहेत. त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ऑनलाइन पद्धती वापरल्या जातात, म्हणून ही वेबसाइट भक्तांना तुळजापूरमध्ये स्थित देवी श्री तुळजाभवानी मातेशी जोडण्यासाठी सर्वोत्कृष्ट सुविधाजनक मंच असेल. ‘मी देवीकडे प्रार्थना आणि कामना करतो की आपल्या जीवनात आनंद आणि समाधानासह आपल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे.

 

More To Explore

Uncategorized

मकरसंक्रांती 2025: सणाचे महत्त्व आणि यावर्षीचे वैशिष्ट्ये

मकरसंक्रांती 2025: सणाचे महत्त्व आणि यावर्षीचे वैशिष्ट्ये मकरसंक्रांती हा भारतातील एक प्रमुख सण असून, निसर्गातील बदल आणि शेतकऱ्यांच्या मेहनतीचा उत्सव साजरा करण्याचा हा दिवस आहे.

Tulja Bhavani Mata Tuljapur
Uncategorized

देवी शाकंभरी: महत्त्व आणि उत्सव

शाकंभरी देवी ही भाजीची देवी असल्याचे म्हटले जाते. देवी शाकंभरी हे माता पार्वतीचे रूप आहे. तिला अनेक नावे आहेत. माता शाकंभरीला देवी वनशंकरी आणि शताक्षी

You cannot copy content of Tulja Bhavani Pujari