महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठा पैकी एक संपूर्ण शक्तीपिठ.धर्मराजाला वर देणारी,प्रभू रामचंद्रास मार्ग दाखविणारी तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवता व भवानी तलवार देणारी हिच ती तुळजा भवानी माता होय.या श्रीक्षेत्रात युगानयुगे या देविचे वास्तव आहे याची प्रचिती अनेक देवि भक्तास ती सतत देत असते.तुळजापूरात वर्षातून दोन वेळा नवरात्र महोत्सव साजरा होत असतो.शारदीय व शाकंभरी असे दोन नवरात्र महोत्सव. नवरात्र महोत्सवात देविला विशेष अलंकार व अवतार पुजा मांडली जात असते. या विशेष अवतार पुजा पाहण्यास व दर्शन घेण्यास देवि भक्तांची संख्या दर नवरात्र मध्ये वाढतच चालली आहे.राज्यातून व परराज्यातून भाविक मोठ्या संख्येने देवि दर्शन घेत आहे.नवरात्रेत पहिले तीन दिवस देविस विशेष सुवर्ण अलंकार नेसविले जात असतात.चौथ्या दिवसा पासून ते आठव्या दिवसापर्यंत विशेष अवतार पुजा मांडली जात असते. यात रथ अलंकार पुजा,मुरली अलंकार पुजा,शेषशाही अलंकार पुजा,भवानी तलवार अलंकार पुजा व महिषाशूर मर्दिनी अलंकार पुजा मांडली जात असते.या सर्व पुजा भोपे पुजारी मांडत असतो यासाठी सेवेदार हमरोजीबूवा भोपे पुजारी यांना मदत करीत असतात. या विशेष अवतार पुजा का मांडली जाते ते पाहूयात.
१) रथ अलंकार पुजा :- भगवान सुर्य नारायण यांनी त्रिलोक भ्रमणासाठी आपला रथ श्री तुळजा भवानी मातेस दिला याचे प्रतीक म्हणून ही पुजा मांडली जात असते.
२) मुरली अलंकार पुजा :- महिषाशूरास देविने नऊ दिवस अविरत पणे युध्द खेळून ठार केले.दैत्याच्या छळा पासून देविने ऋषीमुनी व देवदेवतांना मुक्त केले.यावेळी देविला श्रीकृष्णाने आपली मुरली अर्पण केली.श्री तुळजा भवानी मातेनीं ती मुरली वाजवून भयमुक्त करून पुर्वरत पणे स्वर्ग प्राप्तीचा आनंद देवता गण घेवू लागले.
३)शेषशाही अलंकार पुजा :- भगवान विष्णू क्षिरसागरामध्ये शेष शैय्येवरती विश्राम घेत असताना मातेने त्यांच्या नेत्र कमलात जावून विश्राम घेतला.या वेळी भगवान विष्णू यांच्या दोन्ही कानातून निघालेल्या मला पासून दोन दैत्य उत्पन्न झाले. शुंभ व निशुंभ असे ते दोन दैत्य. ते लगेच शेषशैय्येवरील विष्णूवरती आक्रमण करण्यास जाऊ लागलेत्यावेळी नाभीतून बाहेर येण्यास देविची स्तूती करून जागविले व तिने त्या दैत्यास ठार मारले.म्हणून भगवान विष्णूनीं आपली शेषशैय्या श्री देविस विश्राम करण्यासाठी दिली.म्हणून ही अवतार पुजा मांडली जाते.
४) भवानी तलवार पुजा :- छत्रपती शिवाजी महाराज यांना धर्म रक्षणासाठी व स्वराज्य स्थापन करण्यासाठी श्री तुळजा भवानी माता प्रसन्न होवूनआपल्या हाताने भवानी तलवार देवून आर्शिवाद दिला.ती हि भवानी तलवार अलंकार पुजा.
५) महिषाशूर मर्दिनी अलंकार पुजा :- ज्यावेळी स्वर्ग लोकांतून महिषाशूराने सर्व देव देवता गणास हाकलून दिले व एकटाच स्वर्गाचा आनंद घेवू व भोगू लागला.साक्षात पार्वती अवतार असलेली आई तुळजा भवानी माता सर्व देवतांच्या व ब्रह्म विष्णू महेश यांच्या तेजातून उत्पन्न झालेली हीच ती भवानी दुर्गा.हिनेच नऊ दिवस महिषाशुराशी युध्द खेळून विजय संपादन करून ठार मारले.याची ही अलंकार पुजा मांडली जात असते…